अखिल भारतीय हॉकी स्पर्धा : एसएनबीपी अकादमी, आर्मी बॉईज उपांत्य फेरीत

पुणे :- यजमान एसएनबीपी अकादमीसह, गतउपविजेते ध्यानचंद अकादमी, राऊंड ग्लास अकादमी आणि आर्मी बॉईज संघांनी सातव्या एसएनबीपी 16 वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन एस.ई. सोसायटीच्या एसएनबीपी संस्था समूहाने हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्राच्या सहकार्याने केले आहे. यजमान एसएनबीपी संघाने सत्यमकुमार पटेलच्या तीन गोलच्या जोरावर भोंगीर अकादमी, तेलंगणा संघाचा 11-0 असा धुव्वा उडवून सहज उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला.
आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनीने सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवताना गतविजेत्या एसजीपीसी संघाचा शूट-आऊटमध्ये 4-3 असा पराभव केला. आर्मी बॉईजकडून नितेश शर्मा आणि कर्णधार मनजितने नियोजित वेळेत गोल केले. एसजीपीसीकरडून जसमित सिंगने दोन्ही गोल करून सामना बरोबरीत सोडवला. शूट-आऊटमध्ये आर्मी बॉईजच्या हरपाल, नितेश शर्मा, अर्ष अली, समीर यांनी गोल केले. एसजीपीसीकडून जसमित सिंग, हरजित सिंग, गोयलदीप सिंग यांना गोल करण्यात यश आले. हिम्मत सिंग आणि सुमनप्रीत सिंगला आपले लक्ष्य साधता आले नाही.
गतउपविजेत्या ध्यानचंद अकादमी आणि प्रथमच खेळणाऱ्या राऊंड ग्लास अकादमी संघांनी सहा गोल नोंदवत सहज विजय मिळवला. ध्यानचंद अकादमी संघाने आरके रॉय अकागदमीवर 6-0 असा विजय मिळवला. कल्लु अलीने तीन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मिथालेश यादव आणि अब्दुल कादीर यांनी अन्य गोल केले. राऊंड ग्लास अकादमी संघाने झांसीच्या स्पोर्ट होस्टेल संघाचा 6-2 असा पराभव केला. इंदरजीतने दोन, तर अमनदीप सिंगने पाच गोल केले. पराभूत संघासाठी अनुराग सिंगने दोन्ही गोल केले.





