All India Hockey Tournament 2024 : आर्मी बॉईज, एसजीपीसी उपांत्यपूर्व फेरीत…

All India Hockey Tournament 2024 : – गतविजेत्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीसह माजी विजेता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) अमृतसर आणि डॉन बॉस्को स्कूलने आठव्या एसएनबीपी अखिल भारतीय मुलांच्या 16 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पर्धेत डॉन बॉस्को स्कुल संघाने एसएनबीपी अकादमी संघाला ७-० असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ई गटाच्या या लढतीमध्ये असित माझीने ३ तर आशिष लाक्राने २ तर रोहित हेमब्रम व सुदीप मल्लिक यांनी प्रत्येकी १ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) ग्रासरूट्स हॉकी संघाला ७-० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. शिवम शर्मा व आर्यन कुमार यांनी प्रत्येकी ३ तर सुधांशू कश्यपने १ गोल करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला.
एफ गटाच्या लढतीमध्ये आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने गगन बाबा साहिब दास अकादमी संघाचे आव्हान २-१ असे मोडून काढले. आर्मी बॉईजकडून अर्जुन व रवींद्र प्रधान यांनी तर गगन बाबा अकादमी संघाकडून अर्शदीप सिंगने १ गोल केला.




