Ajit Pawar : “वडिलांनंतर तेच माझे आधार होते..” अजितदादांच्या आठवणीने आमदार सुनील शेळके भरसभेत गहिवरले
Ajit Pawar : माजी मंत्री मदन बाफनांसह दिग्गजांची उपस्थिती; अजितदादांच्या निधनानंतर मावळ राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या प्रचाराबाबत नवीन नियमावली जाहीर.

Ajit Pawar – दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मदन बाफना, सहकार महर्षी माऊली दाभाडे, पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश ढोरे, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, उद्योजक शंकरराव शेळके, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, ज्ञानेश्वर ठाकर, प्रवीण झेंडे, रवी पोटफोडे, नारायण ठाकर, छबूराव कडू, किशोर सातकर, सुरेश चौधरी, अबोली ढोरे, संतोष भेगडे तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक,
नगराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वतःसाठी न जगता सदैव जनतेसाठी कार्यरत राहणारा नेता नियतीने आपल्यातून हिरावून नेला. दादांच्या स्वप्नातला मावळ घडवण्यासाठी गेल्या सहा वर्षांत जे काम झाले, त्याच्या दुप्पट काम करून दाखवणे हीच माझ्याकडून दादांना खरी श्रद्धांजली असेल,
असे भावनिक उद्गार आमदार सुनील शेळके यांनी काढले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अजितदादांच्या कार्याला उजाळा दिला. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा न करता शांतपणे घरोघरी जाऊन प्रचार करावा तसेच विजय मिळाल्यानंतर मिरवणूक काढू नये,
अशा सूचना मनोगतातून देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पसायदानाने शोकसभेची सांगता झाली.मनोगत व्यक्त करताना आमदार सुनील शेळके हे दादांच्या आठवणीने गहिवरून गेले. काही क्षण त्यांचा कंठ दाटून आला.
माझ्या वडिलांनंतर मी दादांना त्या स्थानी मानत होतो. माझे हट्ट पूर्ण करण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. असा नेता पुन्हा मिळणे कठीण आहे. तरीही खचून न जाता नव्या उमेदीने मावळचा विकास करून दादांच्या स्वप्नाची पूर्तता करू.असेही ते म्हणाले.






