Asia Cup 2024 : अफगाणिस्ताननं रचला इतिहास, पहिल्यांदाच एशिया कपचे पटकावले जेतेपद…

ACC Mens T20 Emerging Teams Asia Cup 2024 : पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया चषक 2024 चा अंतिम सामना रविवारी अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळला गेला. अफगाणिस्तान अ संघाने या सामन्यात इतिहास रचला. सेदिकुल्ला अटलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तान अ संघाने इमर्जिंग एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले.
निर्णायक सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघाचा (Afghanistan A vs Sri Lanka A ) 7 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तान अ संघाने प्रथमच इमर्जिंग आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अल्लाह गझनफरला सामनावीर (Player of the match) आणि सादिकुल्लाह अटलला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Series) म्हणून निवडण्यात आले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. यादरम्यान सहान आर्चिगेने अर्धशतक झळकावले. त्याने 47 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय निमेश विमुक्तीने 23, पवन रथनायकेने 20 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत बिलाल सामीने 4 षटकात 22 धावा देऊन सर्वाधिक तीन बळी घेतले आणि अल्लाह गझनफरने 14 धावांत दोन बळी घेतले.
After beating India in the semifinal, Afghanistan cruise past Sri Lanka in the final to win the Emerging Teams Asia Cup 🏆
Massive wins, bright future!
Scorecard: https://t.co/FvvJ3FkiuW pic.twitter.com/xExF7w1bj2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 27, 2024
जेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने 134 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा अफगाणिस्तानने 18.1 षटकांत तीन गडी गमावून सहज पाठलाग केला. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने 55 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर करीम जन्नतने 27 चेंडूत 33 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 3 षटकार मारले.
दरविश रसूलीने 20 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद इशाक 6 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. मात्र, याआधी अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अफगाणिस्तानचा सलामीवीर झुबैद अकबरी खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी डाव सांभाळला आणि विजेतेपदावर नाव कोरलं. श्रीलंकेकडून सहान अरसिंघे, दुशान हेमंथा आणि इशान मलिंगाने प्रत्येकी 1 बळी घेतला. याशिवाय श्रीलंकेच्या इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही.





