IND vs NZ 2nd ODI : दुसऱ्या वनडेत किवी संघाचे शानदार पुनरागमन; टीम इंडियाचा पराभव करत मालिकेत साधली बरोबरी…

India W vs New Zealand W 2nd ODI : न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 76 धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी हा सामना झाला. क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने आधी पुरुष संघाचा आणि आता महिला संघाचा पराभव केला आहे. टीम इंडियाविरुद्धच्या या विजयानंतर न्यूझीलंड संघानं महिला वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य दिले होते. पण टीम इंडिया 183 रन्सवर ऑलआऊट झाली. न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन ही सामन्याची मानकरी ठरली. तिने फलंदाजीत 79 धावा तर गोलंदाजीत 27 धावा देताना तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
महिला टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची पहिली विकेट स्मृती मानधनाच्या रूपाने पडली. तिला खातेही उघडता आले नाही. शेफाली वर्माही फक्त 11 धावांवर बाद झाली त्यानंतर यास्तिका भाटिया 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 35 चेंडूंचा सामना करत 24 धावा केल्या. तिने या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार मारला. जेमिमाह रॉड्रिग्ज 17 धावा तर तेजल हसबनीस आणि दिप्ती शर्मा प्रत्येकी 15 धावा करून बाद झाल्या. एकाही भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही आणि अशा प्रकारे टीम इंडियाचा डाव 47.1 षटकात 183 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून सोफी डेव्हाईन आणि लिया ताहुहू यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर जेस केर आणि ईडन कार्सन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले.
New Zealand showcase their all-round strength in the second ODI against India, setting the stage for an exciting series decider 💪
📝 #INDvNZ: https://t.co/kn3nVkQiHS pic.twitter.com/uU9Gk6bAyC
— ICC (@ICC) October 27, 2024
सायमा-राधाची सर्वोत्तम भागीदारी…
टीम इंडियाने 108 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर सायमा ठाकोर आणि राधा यादव यांच्यात उत्कृष्ट भागीदारी झाली. राधा आणि सायमाने 70 धावांची भागीदारी केली. यादरम्यान सायमाने 54 चेंडूंचा सामना करत 29 धावा केल्या. तिने 3 चौकार मारले. 64 चेंडूंचा सामना करताना राधाने 5 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. मात्र या जोडीला संघाला विजयापर्यंत नेता आले नाही.
कर्णधार सोफीची शानदार खेळी….
तत्पूर्वी, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमावून 259 धावा केल्या. सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स यांनी अर्धशतकी खेळी केल्या. सोफी डिव्हाईनने 86 चेंडूत 79 धावा केल्या तर अनुभवी सुझी बेट्सने 70 चेंडूत 58 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॉर्जिया प्लिमरने 50 चेंडूत 41 धावा तर मॅडी ग्रीनने 41 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यासाठी तिनं 10 षटकात 69 धावा खर्च केल्या. तर दिप्ती शर्मानं 10 षटकात 30 धावा देत 2 गडी बाद केले. याव्यतिरिक्त प्रिया मिश्रा आणि सायमा ठाकोर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.





