U19 Women’s T20 Asia Cup 2024 : टीम इंडियाची Final मध्ये धडक, सुपर फोरच्या सामन्यात श्रीलंकेला केलं पराभूत…

U19 Women’s T20 Asia Cup 2024 (Super Four Match, IND vs SL) : अंडर 19 आशिया कप 2024 च्या स्पर्धेमध्ये टीम इंडियानं दमदार कामगिरी केली आहे. सुपर फोरच्या सामन्यात संघाने श्रीलंकेचा पराभव करत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला विजयासाठी 99 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट्स राखून सामना जिंकला. आयुषी शुक्लाने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली. तिने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
India Women U19 vs Sri Lanka Women U19 | ACC Women’s U19 Asia Cup | Match 10https://t.co/gTgHEhCkjN#ACC #ACCWomensU19AsiaCup #INDWvsSLW pic.twitter.com/QclMOffQSo
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 20, 2024
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 98 धावा केल्या होत्या. यादरम्यान कर्णधार नानयाकारा हिने 30 चेंडूत सर्वाधिक 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुमुदूने 31 चेंडूंचा सामना करत 21 धावा केल्या. सलामीवीर संजना 9 तर हिरुनी हंसिका केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यादरम्यान भारताकडून गोलंदाजीत आयुषी शुक्लाने 4 षटकात 10 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले तर पारुनिका सिसोदियाने 4 षटकात 27 धावा देत 2 बळी घेतले. शबनम आणि धृतीला प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.
प्रत्युत्तरात भारतीय महिला संघानं केवळ 14.5 षटकांत 6 गडी गमावून 99 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघासाठी गोंगडी त्रिशा हिने 24 चेंडूत 2 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 32 धावा केल्या तर जी कमलिनी हिने 26 चेंडूत 28 धावांची अन् मिथिला विनोद हिने 12 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 17 धावांची खेळी केली.
आता जेतेपदासाठी टीम इंडियाचा सामना बांगलादेश आणि नेपाळ यांच्यातील सुपर-4 च्या विजेत्याशी होणार आहे. याआधी टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने ग्रुप स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. यानंतर सुपर-4 मध्ये टीम इंडियाने बांगलादेश आणि आता श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले. आता प्रथमच खेळल्या जात असलेल्या U19 महिला आशिया चषक 2024 चे विजेतेपद पटकावण्यात भारत यशस्वी होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.





