Asia Cup 2024 : पाकिस्तानचे ट्रॉफी जिंकण्याचे भंगले स्वप्न, उपांत्यफेरीत श्रीलंकेनं चारली पराभवाची धूळ….

Asia Cup 2024 (Pakistan vs Sri Lanka,SemiFinal 2) : ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये, पहिला सेमीफायनल सामना 25 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी जेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास यावेळी उपांत्य फेरीतच संपला. श्रीलंकेने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 20 षटकात 9 विकेट गमावत 135 धावा केल्या आणि श्रीलंकेला विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य मिळाले. यानंतर श्रीलंकेच्या संघाने 16.3 षटकात 3 विकेट गमावत 137 धावा करत सामना जिंकला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हरिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या संघाची फलंदाजी खूपच खराब झाली. पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली नाही. सलामीवीर ओमेर युसूफ वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. पाकिस्तानकडून युसूफने 46 चेंडूत 5 चौकार अन् 4 षटकारासह 68 धावा केल्या . त्याच्याशिवाय हैदर अलीने 14 ,मोहम्मद इम्रानने 13 धावा तर अराफात मिनहासने 10 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अशाप्रकारे संपूर्ण संघाला 9 गडी गमावून केवळ 135 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंका संघाकडून दुशान हेमंताने सर्वाधिक चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय निपुण रंसिका आणि इशान मलिंगाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेने 136 धावांचे सहज पाठलाग केले. लाहिरू उडानाने 20 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली. तर अहान विक्रमसिंघेने 46 चेंडूत 52 धावा केल्या. गेल्या सामन्यात 5 विकेट घेणारा पाकिस्तानी गोलंदाज शाहनवाझ दहनी देखील श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर हतबल ठरला. पाकिस्तानने 6 गोलंदाजांचा वापर केला, त्यापैकी फक्त 2 गोलंदाज विकेट घेऊ शकले. पाकिस्तान संघाकडून सुफियान मुकीम आणि अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Sri Lanka ‘A’ win the ACC #MensT20EmergingTeamsAsiaCup semi-final by seven wickets.
Scorecard: https://t.co/c0dPh9aHog#PAKvSL pic.twitter.com/bnpSqKpjGf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 25, 2024
दुशान हेमंता ठरला सामन्याचा हिरो…
श्रीलंकेचा लेगस्पिनर दुशान हेमंता उपांत्य फेरीच्या सामन्याचा हिरो ठरला. हेमंताने 4 षटकात केवळ 21 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानला केवळ 135 धावांवर रोखण्यात श्रीलंकेचा संघ यशस्वी झाला. हेमंताला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
भारताविरूध्द होऊ शकतो अंतिम सामना…
दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान क्रिकेट संघाशी सध्या खेळवला जात आहे. भारत इमर्जिंग एशिया कप 2024 ची अंतिम फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार आहे. जर भारतीय संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पराभूत केले तर 27 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेसोबत अंतिम सामना खेळेल.





