Ind vs Ban 1st Test (Virat Kohli) : प्रदीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीसाठी, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळला गेलेला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना काही खास नव्हता. या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला केवळ 6 धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 17 धावा निघाल्या. या सामन्यात कोहलीला केवळ 23 धावा करता आल्या असल्या तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडला आहे. कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वात कमी डावात 12000 धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू बनला आहे.
सचिनसह पॉन्टिंग आणि कॅलिसला टाकले मागे…
चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने 5वी धाव पूर्ण करताच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वात कमी डावात 12000 धावा पूर्ण करणारा तो खेळाडू बनला. कोहलीने अवघ्या 243 डावात ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता ज्याने 267 डावात मायदेशात 12000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
त्याच वेळी, मायदेशात भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे, ज्याने 14 हजार 192 धावा केल्या आहेत, तर कोहलीने आतापर्यंत 12 हजार 012 धावा केल्या आहेत.
सर्वात कमी डावात 12 हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू
विराट कोहली – 243 डाव
सचिन तेंडुलकर – 267 डाव
कुमार संगकारा – 269 डाव
जॅक कॅलिस – 271 डाव
रिकी पाँटिंग – 275 डाव
Ind vs Ban 1st Test : चेन्नई कसोटीत बुमराहची कमाल, 4 विकेटसह आणखी एका विक्रमाला घातली गवसणी…
‘या’बाबतीत कोहली पाचव्या क्रमांकावर…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर (मायदेशात) सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली सध्या पाचव्या स्थानावर आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर 14 हजार 192 धावांसह पहिल्या स्थानावर आहे, रिकी पाँटिंग 13 हजार117 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, जॅक कॅलिस 12 हजार 305 धावांसह तिसऱ्या स्थानावर तर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 12 हजार 043 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.