ACB Map Controversy : भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी पेटला वाद! अफगाणिस्तानच्या प्रोमोने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
ACB Map Controversy : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेपूर्वी एका प्रोमो व्हिडिओवरून आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे, नेमका वाद काय आहे? जाणून घेऊया

Afghanistan Cricket Board Promo Video Map Controversy India vs Pakistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी एका प्रोमो व्हिडिओवरून आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) ६ सप्टेंबर रोजी मालिकेच्या प्रसिद्धीसाठी एक खास व्हिडीओ जारी केला होता, ज्यामध्ये दोन्ही देशांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करण्यात आले होते. मात्र, व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या भारताच्या नकाशामुळे पाकिस्तानात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) कारवाईची मागणी सुरू झाली आहे.
भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर; पाकिस्तानात तीव्र संताप!
या प्रोमो व्हिडिओमध्ये पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे भारताच्या अधिकृत सीमेत दाखवण्यात आले होते, तर दुसऱ्या भागात नकाशाच्या सीमा वेगळ्या स्वरूपात दिसत होत्या. यावरून सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले. पाकिस्तानी युजर्सनी यावर तीव्र आक्षेप घेत पीसीबीकडे दाद मागितली. मिळालेल्या वृत्तानुसार, पीसीबीने हे प्रकरण अधिकृतपणे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडेही उपस्थित केले आहे.
Days before the India-Afghanistan T20I series, the Afghanistan Cricket Board (ACB) sparked controversy after sharing a map of India that was reportedly incorrect. pic.twitter.com/2YVNMeclro
— Bhaskar English (@BhaskarEnglish_) September 7, 2026
विवाद वाढताच जुना व्हिडीओ हटवला; एसीबीने जारी केला नवा प्रोमो!
A series the nation has been eagerly awaiting. 🤩
A series that will once again bring together two nations with deep-rooted history, culture, and a shared passion for the game.🤜🤛
These are more than just matches. They are encounters of passion, excitement, and… pic.twitter.com/od7wdd0mss
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 9, 2026
नकाशाच्या सीमांवरून भारतीय युजर्सकडूनही अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले गेल्यानंतर एसीबीने वाद टाळण्यासाठी जुना व्हिडीओ तातडीने सोशल मीडियावरून हटवला. त्यानंतर बोर्डाने नव्याने सुधारित व्हिडीओ जारी केला. या नव्या व्हिडिओमध्ये नकाशाच्या वादग्रस्त सीमा स्पष्टपणे न दाखवता काश्मीरच्या प्रतिकासोबत दिल्लीच्या इंडिया गेटची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. बोर्डाने या बदलावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मालिका; अफगाणिस्तान ‘होम टीम’!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हे तीन टी-२० सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानला आपल्या देशात आंतरराष्ट्रीय सामने खेळवता येत नसल्याने ते भारत किंवा युएईमध्ये सामने आयोजित करतात. त्यामुळे या मालिकेत अफगाणिस्तान हा कागदावर ‘यजमान’ (होम टीम) संघ असला, तरी तिन्ही सामने भारताच्या भूमीवरच रंगणार आहेत.





