AFG vs NZ Test Day 2 : दुसऱ्या दिवसाचा खेळही रद्द, असुविधा पाहता अफगाणिस्ताननं दिली तिखट प्रतिक्रिया…

AFG vs NZ Test Day 2 Update : ग्रेटर नोएडा येथे 9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. पाऊस थांबल्यावर मैदान ओले असल्यामुळे दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुपारी साडेचार वाजता पंचांनी मैदानाची अंतिम पाहणी केली आणि त्यानंतर दिवसाचा खेळ रद्द केल्याची घोषणा केली.
पहिल्या दिवशी पाऊस पडल्यानंतर ओल्या मैदानामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दुसऱ्या दिवशीही परिस्थिती बदलली नाही आणि आज दुसऱ्या दिवसाचा सामनाही ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला आहे. अवघे दोन दिवस झाले असून अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याचा नाणेफेक अद्याप झालेला नाही.
Day 2 Abandoned! 😕
Day 2 of the one-off #AFGvNZ Test has officially been called off. Despite multiple efforts to dry the surface, the outfield remained unfit for play.#AfghanAtalan | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/IB1GpKOZhw
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 10, 2024
दरम्यान, पहिल्या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नव्हता तरी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आला. वास्तविक, एक दिवस अगोदर पाऊस पडला होता, त्यामुळे मैदान ओले झाले होते, मात्र असुविधेमुळे ते मैदान कोरडे करण्यात कर्मचारी अपयशी ठरले. दुसऱ्या दिवशी ग्राउंड्समनने विविध युक्त्या वापरल्या. त्यांनी स्पंज आणि इलेक्ट्रिक पंखे वापरले, अगदी सुपर सॉपरने सुकवण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही युक्ती कामी आली नाही.
येथे पुन्हा येणार नाही, अफगाणिस्ताननं दिली तिखट प्रतिक्रिया…
ग्रेटर नोएडाच्या मैदानावरील ‘खराब व्यवस्थे’मुळे अफगाणिस्तान संघ अजिबात नाखूश दिसला. एका वृतसंस्थेशी बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ते पुन्हा इथे खेळायला येणार नाही. याशिवाय अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची पहिली पसंती लखनौला होती, ग्रेटर नोएडाला नाही.” अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण खराब व्यवस्थापन आणि खराब प्रशिक्षण सुविधांचा अभाव यामुळे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू त्रस्त झाले आहेत. हा निष्काळजीपणा आहे. आम्ही इथे परत येणार नाही.”
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड भारतात न्यूझीलंडचे यजमानपद भूषवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रेटर नोएडातील मैदानांची दुरवस्था आणि सुविधांबाबत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्याने नुकतीच नाराजी व्यक्त करत मैदानावर सामान्य सुविधाही उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. याशिवाय व्यवस्थापनानेही अत्यंत निष्काळजीपणा दाखवला आहे, त्यामुळे ते आतापासून कधीही ग्रेटर नोएडामध्ये खेळणार नाही. बोर्ड भविष्यात लखनौच्या ठिकाणाला प्राधान्य देईल. अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीनेही काही दिवसांपूर्वी या मैदानाची खिल्ली उडवली होती.




