AFG vs NZ Test : अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द…

Afghanistan vs New Zealand Test Day 3 Updates : ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय पथिक क्रीडा संकुलात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही खेळ झाला नाही. सततच्या मुसळधार पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला, तर पहिले दोन दिवस मैदान ओले असल्यामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. सध्याचा हवामानाचा अंदाज आणि स्टेडियमची खराब सुविधा पाहता येत्या दोन दिवसांत खेळ होण्याची शक्यता कमीच आहे.
तिसऱ्या दिवसाची परिस्थिती…
नुकत्याच हाती आलेल्या स्टेडियमच्या छायाचित्रानुसार, मैदानावर तसेच खेळपट्टीवरही पाणी साचल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या परिस्थितीमुळे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांच्या खेळाडूसह सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचीही निराशा झाली आहे, जे या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते.
Not the news we wanted to share! 😕
Heavy overnight rain and ongoing drizzle have resulted in Day 3 of the One-Off #AFGvNZ Test being washed out. Officials will assess the conditions again tomorrow morning.#AfghanAtalan | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/UOUR4oc2zx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 11, 2024
काल(मंगळवार) दिवसाच्या उत्तरार्धात न्यूझीलंडचे खेळाडू सराव करताना दिसले, त्यांना खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. पण आता त्यांच्या आशा संपल्याचं स्पष्ट झालं आहे. अफगाणिस्तान संघ देखील निराश आहे की त्यांचा सामना नियोजनाप्रमाणे झाला नाही आणि याला ते स्वतः जबाबदार आहेत, कारण स्टेडियमची निवड अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) केली होती.
कर्मचाऱ्यांकडून 2 दिवसांपासून मैदान सुखवण्याचे प्रयत्न सुरूच…
सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस आणि ओले मैदान यामुळे संपूर्ण दोन दिवस वाया गेले. ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या ग्राउंड्समनने नेट एरियातील गवत उपटून ओल्या जागी ठेवले तसेच यासह ओले भाग सुकविण्यासाठी पंखे चालवून मैदानावर कोरडे करण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नांनंतरही सामना सुरू होऊ शकला नाही. वारंवार खेळ रद्द होत असल्याने सर्वांची निराशा वाढत आहे. आता सर्वांच्या नजरा खेळ लवकर सुरू होईल की नाही, यासाठी पुढील दोन दिवसांवर लागल्या आहेत.




