AFG vs NZ Test : टॉसविनाच चौथ्या दिवसाचाही खेळ रद्द, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीची अवस्था बिकट…

Afghanistan vs New Zealand Test Day 4 Update : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा एकमेव कसोटी सामना चौथ्या दिवशीही सुरू होऊ शकला नाही. सामन्याचा चौथा दिवसही टाॅसविनाच(Toss) रद्द करावा लागला. सततच्या पावसामुळे सामना होण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज सामना सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र आत्तापर्यंत तसे झालेले नाही.
ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर 9 सप्टेंबरपासून हा सामना सुरू होणार होता, मात्र पावसामुळे मैदान ओले असल्यामुळे 4 दिवस उलटूनही सामना सुरू होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी सकाळीच मैदानावर पाऊस झाला, त्यामुळे गुरूवारीही खेळ रद्द करावा लागला. आता पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सामना सुरू होतो की नाणेफेक न होता पावसामुळे सामना रद्द होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अनेक माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार असे सांगण्यात आले आहे की, मुसळधार पावसामुळे मैदान कोरडे होण्यास अनेक दिवस लागू शकतात. अशा स्थितीत सामन्याचा पाचवा दिवसही पावसामुळे वाया जाईल आणि नाणेफेक न होताच सामना रद्द होऊ शकतो.
Still no play possible in Noida with day four called off due to the wet outfield. Teams and officials will return tomorrow for the final time to see if any play is possible #AFGvNZ pic.twitter.com/o74nn6u6Eb
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 12, 2024
ग्रेटर नोएडा स्टेडियमचे गैरव्यवस्थापन…
ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या मंगळवारी (11 सप्टेंबर) ग्राउंड्समन पंख्याने मैदान कोरडे करताना दिसले. मैदान कोरडे करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. याशिवाय कॅटरिंग कर्मचारी वॉशरूममध्ये भांडी धुताना आढळून आले होते.
AFG vs NZ Test : अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द…
स्टेडियमवर काही वर्षांपूर्वीच घातली आहे बंदी…
महत्वाचे म्हणजे, बीसीसीआयने ग्रेटर नोएडाच्या स्टेडियमवर काही वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये या स्टेडियममध्ये कॉर्पोरेट सामने खेळवण्यात आले होते, ज्यामध्ये फिक्सिंगचा मुद्दा समोर आला होता, त्यानंतर बीसीसीआयने स्टेडियमवर बंदी घातली होती. मात्र, आता स्टेडियमवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनही या स्टेडियमला फारसे महत्त्व देत नाही.





