ENG vs SL 3rd Test : श्रीलंकेचा शानदार विजय, दहा वर्षांनंतर कसोटीत केला असा पराक्रम; इंग्लंडचे भंगले स्वप्न…

England vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंड दौऱ्यावरील तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने आश्चर्यकारक कामगिरी केली. तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने इंग्लंडला धूळ चारली आणि बेझबॉलची हवाच काढली.
इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 156 धावांत गूंडाळल्यानंतर श्रीलंका संघाने विजयासाठी आवश्यक असलेल्या 219 धावा केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करताना मालिकेतील तिसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळविला. तीन कसोटीच्या मालिकेत, इंग्लंड संघाने 2-1 अशी खिशात टाकली. इंग्लंडच्या जो रूटला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्हाईट वॉशच्या स्वप्नांवर फेरले पाणी
पहिल्या डावात इंग्लंड संघाने 325 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात 263 धावा केल्या, परंतु ते 62 धावांनी पिछाडीवर राहिले. दुसऱ्या डावात श्रीलंकेने इंग्लंड संघाला केवळ 156 धावांत बाद केले. यावेळी श्रीलंका संघाला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा सलामीवीर पाथूम निस्संकाने दमदार शतकी खेळी करताना इंग्लंडच्या व्हाईट वॉशच्या स्वप्नांवर पाणी फेरले. निस्संकाने 124 चेंडूत 102.41 च्या स्ट्राईक रेटने 127 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत निस्संकाने 13 चौकार व 2 षटकार लगावले.
श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. दिमुथ करुणारत्ने 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर निस्संकाने कुसल मेंडिससोबत 69 धावांची भागीदारी करताना श्रीलंका संघाला मजबूत स्थितीत आणले. मेंडिसने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर निस्संकाने अँजेलो मॅथ्यूजसोबत 111 धावांची भागीदारी करताना श्रीलंका संघाला विजय मिळवून दिला. अँजेलो मॅथ्यूजने 32 धावांची महत्वपूर्ण खेळी करताना संघाच्या विजयात हातभार लावला.
श्रीलंकेने 10 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध जिंकली कसोटी …
श्रीलंकेने 2014 साली इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. आता 10 वर्षांनंतर श्रीलंकेने इंग्लंडचा कसोटी सामन्यात पराभव केला आहे. 2014 नंतर श्रीलंकेने ब्रिटीशांविरुद्ध 10 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 9 इंग्लंडने जिंकले आणि एक कसोटी अनिर्णित राहिली. पण आता अखेर श्रीलंकेच्या संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत विजय मिळाला आहे. इंग्लिश भूमीवर श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्धचा हा चौथा कसोटी विजय आहे. यापूर्वीचा विजय 2014 साली झाला होता.
What a fantastic victory to end the series! Sri Lanka beat England by 8 wickets in the 3rd Test.
Congratulations to the team on a brilliant performance!
👏 #ENGvSL 🏏 pic.twitter.com/VZk1HUyWWb
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2024
विश्वकसोटी स्पर्धेत श्रीलंका पाचव्या क्रमाकांवर…
विश्वकसोटी स्पर्धेत श्रीलंका व इंग्लंड हे दोन्ही संघ अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत. या मालिकेनंतर श्रीलंका संघाला न्यूझीलंड बरोबर 2 सामान्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघासमोर पाकिस्तान संघाचे आव्हान असणार आहे. सध्याच्या घडीला या विश्वकसोटी क्रमवारीत भारत अग्रस्थानी असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे.
Impact Player Rule : इम्पॅक्ट प्लेयरचा वापर देशांतर्गत स्पर्धेत करावा – ग्रॅमी स्मिथ
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव : 69.1 षटकांत सर्वबाद 325, श्रीलंका पहिला डाव : 61.2 षटकांत सर्वबाद 263, इंग्लंड दुसरा डाव : 34 षटकांत सर्वबाद 156, श्रीलंका दुसरा डाव : 40.3 षटकांत 2 बाद 219 (पाथूम निस्संका नाबाद 127 (13 चौकार, 2 षटकार), कुसल मेंडिस 39 (7 चौकार), अँजेलो मॅथ्यूज 32 (3 चौकार), ख्रिस वोक्स 12-0-52-1, गस ऍटकिन्सन 11-1-44-1)





