Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर वकील असीम सरोदेंनी उपस्थित केले ‘हे’ 2 मोठे प्रश्न…

Adv Asim Sarode On Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. बदलापुरातील एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. बदलापूरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे रोकली होती. याशिवाय कडकडीत बंद पाळला होता. या आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विरोधक शंका व्यक्त करत आहेत. तर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडिया एक्सवर असीम सरोदे म्हणाले, “बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने kashi वापरली?”
बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने kashi वापरली?
— Asim Sarode (@AsimSarode) September 23, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे.
‘विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. वास्तव सगळ्यांसमोर आलं पाहिजे. असं ते म्हणाले. तर त्याने गोळी मारली हे इतक सहज आहे का याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया –
सोशल मीडिया एक्सवर शरद पवार म्हणाले, बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.





