Adar Poonawalla RCB : आरसीबीच्या मालकीच्या लढाईत एका नवीन दावेदाराची एन्ट्री! प्रसिद्ध उद्योगपती उत्सुक
Adar Poonawalla RCB : आदर पूनावाला यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Adar Poonawalla RCB Bid IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट विश्वातून एक सर्वात मोठी व्यावसायिक बातमी समोर येत आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे मालकी हक्क बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती आदर पूनावाला यांनी आरसीबी संघ खरेदी करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.
आदर पूनावाला यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत –
गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आदर पूनावाला यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी लिहिले, “येणाऱ्या काही महिन्यांत आरसीबीसाठी एक मजबूत आणि स्पर्धात्मक बोली लावण्याची तयारी करत आहे. हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे.” पूनावाला यांच्या या एन्ट्रीमुळे आरसीबीच्या मालकी हक्कासाठी होणारी स्पर्धा आता अधिक तीव्र झाली असून संघाची किंमतही गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
Over the next few months, will be putting in a STRONG and COMPETITIVE bid for @RCBTweets, one of the best teams in the IPL.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 22, 2026
होम्बले फिल्म्सही शर्यतीत –
आदर पूनावाला आरसीबी संघ खरेदी करण्यासाठी इच्छुक
पूनावाला यांच्या व्यतिरिक्त ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारी होम्बले फिल्म्स (विजय किरागंदूर) ही कंपनी देखील आरसीबी खरेदी करण्याच्या शर्यतीत असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात उद्योग क्षेत्र आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज आरसीबीसाठी आमनेसामने येऊ शकतात.
विजयाचा आनंद अन् भीषण अपघाताचे सावट –
आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये १७ वर्षांची प्रतीक्षा संपवून पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरले. रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली संघाने पंजाब किंग्सचा पराभव करून इतिहास रचला. मात्र, ४ जून रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित विजयी परेडला गालबोट लागले. ३ लाखांहून अधिक चाहत्यांच्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ निष्पापांचा बळी गेला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेमुळे फ्रँचायझीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता, ज्याचा परिणाम आता मालकी हक्क बदलण्यावर होत असल्याचे बोलले जात आहे.





