मुंबई – अदानी पॉवरने मध्य भारतातील कोळसा प्रकल्प ताब्यात घेण्याची आपली योजना रद्द केली आहे. आज त्यांनी तसे शेअर बाजारालाही कळवले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, अदानी पॉवरने 70.2 अब्ज रुपये मूल्यावर डीबी पॉवरचे नियंत्रण घेण्यास सहमती दर्शवली होती. एका महिन्यानंतर सरकारच्या संबंधीत नियामक संस्थेने या संपादनास मान्यता दिली होती. पण सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाने हा प्रकल्प खरेदी करण्याचा नाद सोडून दिला आहे.
अदानी पॉवर कंपनीने डीबी पॉवरचा हा प्रकल्प खरेदी करण्याची प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पुर्ण करणे अपेक्षित होते. परंतु हे करण्यास अदानी समुह असमर्थ ठरला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी हा व्यवहार रद्द करण्याचे मान्य केले आणि तशी माहिती मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला कळवण्यात आली आहे. डीबी पॉवर कंपनी भारताच्या छत्तीसगड राज्यात 1.2 गिगावॅट कोळसा ऊर्जा प्रकल्प चालवते. हा प्रकल्प खरेदी करण्यासाठी अदानी समुहाने करार केला होता.