1 डिसेंबरपासून जुन्या वाहनांवर HSRP पाटी नसल्यास कारवाई सुरू

पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार १ डिसेंबर २०२५ पासून जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविलेली नसल्यास संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रादेशिक परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून १५ ऑगस्ट २०२५ करण्यात आली होती.
यानंतर, राज्य शासनाने ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. ही मुदत अंतिम असल्याचे स्पष्ट करत, १ डिसेंबरपासून HSRP न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाच्या वायू एकक व विशेष पथकांद्वारे ही तपासणी मोहिम राबवली जाणार आहे. वाहनधारकांनी तात्काळ आपापल्या वाहनांवर सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून दंडात्मक कारवाईपासून वाचावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.





