पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार ठरला? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ravindra Chavan : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागलेले आहेत. दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
एकीकडे स्थानिक निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चांना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अनेक शिक्षण नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असतानाच रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाने महायुतीचा पुणे शिक्षक मतदार संघासाठी उमेदवार ठरला असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मतदार नोंदणी सध्या जोरात सुरु आहे. महायुतीकडून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण चळवळीतील शिक्षकांचे नेतृत्व करणारा चेहरा म्हणत नंदकुमार सागर यांचे कौतुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे नंदकुमार सागर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत प्राचार्य नंदकुमार सागर?
- शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे आणि गेली तीन दशके शिक्षक संघाचे काम करणारे नेते आहेत.
- मोर्चे, आंदोलने यातून त्यांनी शिक्षक-शिक्षकेतरांसाठी न्याय भूमिका घेतली आहे.
- विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे.
- प्राचार्य सागर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
- महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
- जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.
आत्तापासूनच तयारीला वेग
आता या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरही अनेक शिक्षण नेते उमेदवारीसाठी आग्रही असून अनेक नावांची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. पण यासाठी आत्तापासूनच जोरदार तयारी केली जात आहे.
हेही वाचा : Pimpri :लाडकी बहीण योजनेमुळे साडी बाजार तेजीत!





