Pune : जुनी वाहन खरेदी-विक्री ; विक्रेत्यांना मिळणार परवाना

पुणे : जुने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. त्यामुळे अशा वाहनाच्या खरेदी-विक्रीत येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे.
शहर तसेच ग्रामीण भागात चौका-चौकात जुनी वाहन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केली जाते. मात्र, अशा वाहनाचे पुढे काय झाले? विक्रेत्याने ते वाहन कोणाला विकले, ते वाहन खरेदी करणाऱ्याच्या नावावर झाले की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती मूळ वाहन मालकाला मिळत नाही. मात्र, भविष्यात एखादी अडचण आल्यास असा प्रकार उघडकीस येतो आणि नाहक मूळ वाहनमालकाला त्रास सहन करावा लागतो.
वाहन विक्री केल्यावर संबंधीत व्यक्तीच्या नावावर नोंद न करणे, कागदपत्र अपूर्ण ठेवणे, परस्पर वाहनांची विक्री करणे अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. कधी-कधी वाहन मालकाने विक्रीसाठी एनओसी दिलेली असते. पण, ते वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केलेले नसते. तर, जुन्या वाहन खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार देखील घडतात. त्यामुळे केंद्र सरकारने पूर्वीच जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचा धोरण आखले होते. पण, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती.
पुणे आरटीओने त्यांच्या हद्दीतील जुन्या वाहन खरेदी विक्री करणाऱ्यांना आता अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची जुन्या वाहन खरेदी-विक्रीची उलाढाल होते. या जुन्या वाहन खरेदी विक्रीमध्ये नंतर अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या अडचणी दूर करण्यासाठी पुणे आरटीओने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जुन्या वाहन विक्रेत्यांना आरटीओकडे त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
२९ बी नुसार प्रमाणपत्र…
जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांनी पुणे आरटीओकडे २९ ए नुसार अर्ज केल्यानंतर आरटओकडून २९ बी नुसार अधिकृत विक्रीचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे या वाहन विक्रेत्यांना खरेदी-विक्री करणे सोपे होणार आहे. तसेच, चोरीची वाहने, फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.





