Pimpri : जुनी वाहने खरेदी-विक्री परवान्यासाठी विक्रेते उदासीन

पिंपरी : केंद्र सरकारने पूर्वीच जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचे धोरण आखले असून या धोरणाला पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत विक्रेते उदासीन असल्याने आतापर्यंत जुने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या एकाही डिलर किंवा संकेतस्थळाने अर्ज केला नसल्याचे समोर आले आहे.
जुने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शहर तसेच ग्रामीण भागात चौका-चौकात जुनी वाहन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केली जाते. मात्र, अशा वाहनाचे पुढे काय झाले? विक्रेत्याने ते वाहन कोणाला विकले, ते वाहन खरेदी करणाऱ्याच्या नावावर झाले की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती मूळ वाहन मालकाला मिळत नाही. मात्र, भविष्यात एखादी अडचण आल्यास असा प्रकार उघडकीस येतो आणि नाहक मूळ वाहनमालकाला त्रास सहन करावा लागतो.
वाहन विक्री केल्यावर संबंधित व्यक्तीच्या नावावर नोंद न करणे, कागदपत्र अपूर्ण ठेवणे, परस्पर वाहनांची विक्री करणे अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. कधी-कधी वाहन मालकाने विक्रीसाठी एनओसी दिलेली असते. पण, ते वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केलेले नसते. तर, जुन्या वाहन खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार देखील घडतात.
त्यामुळे केंद्र सरकारने पूर्वीच जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचा धोरण आखले होते. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. पिंपरी चिंचवड आरटीओने त्यांच्या हद्दीतील जुन्या वाहन खरेदी विक्री करणाऱ्यांना आता अधिकृत परवाना घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन होते फसवणूक
सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या वाहनांचीही विक्री ऑनलाइन माध्यमातून होते. यासाठी काही संकेतस्थळे, ॲप्सचा वापर केला जाते. तसेच समाजमाध्यमातून ग्रुप्स किंवा वैयक्तिक पातळीवरही जुन्या वाहनांची खेरदी-विक्री केली जाते. मात्र, विकलेले वाहन नवीन मालकाच्या नावावर झाले की नाही, याबाबत कोणतीच खातरजमा केली जात नाही. अशी वाहने हस्तांतरित न झाल्याने जुन्या मालकाला वाहतूक नियमाचे दंड किंवा पोलीस प्रकरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येते.
जुन्या वाहनांची खरेदी विक्री करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. याबाबत संपूर्ण देशभरात धोरण लागू आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातही जुन्या वाहनांच्या डीलर व वेबसाइट यांना परवानासाठी आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत एकही अर्ज यासंदर्भात आरटीओ कार्यलयात आलेला नाही. मात्र, याबाबत आम्ही जनजागृती करणार आहोत.
– संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड





