पिंपरी | एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

लोणावळा, (वार्ताहर) – एकेरी वाहतूकीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १६० वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच, वाहन चालकांनी एकेरी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.
लोणावळा शहरातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतूक नियमन करून त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही वाहन चालक वारंवार आदेशाचा भंग करुन एकेरी मार्गाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामुळे अशा वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या १६० मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.





