पिंपरी | लोणावळेकरांनो… आता तरी नियमांचे पालन करा

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात एकेरी वाहतुकीच्या संदर्भात आदेश पारित करून दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. मात्र आजही लोणावळेकर नागरिक सर्रास या आदेशाचे उल्लघंन करीत आहेत.
आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अशा २०० वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबवित कारवाई करण्यात आली. पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या २०० वाहन चालकांकडून तब्बल १ लाख ३३ हजारांचा दंड वसूल केला आहे.
लोणावळा शहरातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल आणि इंद्रायणी पूल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करुन त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत.
नागरिकांना याची माहिती देण्यासाठी तसेच नो एन्ट्री मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी इंद्रायणी पूल तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरिकेट लावून वाहतूक पोलीस तसेच वॉर्डन तैनात केले आहेत.
तरीही नागरिक नो एन्ट्री मधूनच आपले वाहन घेऊन जाण्याचा अट्टाहास करीत आहे. मात्र त्यांच्या अट्टहासामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
विशेषतः इंद्रायणी पूल ते रानडे हॉस्पिटल रोडवर पुरंदरे विद्यालय, आशीर्वाद हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटल समोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात.
यामुळे मुळातच अरुंद झालेल्या मार्गावरून एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत समोरून येणाऱ्या वाहनांमुळे मार्गावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना कोणी समजावून सांगण्याचा किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर ही मंडळी त्यांना चार शब्द सुनावतात.
जाणूनबुजून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा उद्धट आणि बेदरकार वाहन चालकांवर अंकुश बसावा या उद्देशाने लोणावळा पोलिसांनी अखेर कारवाईचे हत्यार उचलले आहे. मागील आठवड्यात १६० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती.
तरी देखील हम नही सुधरेंगे असे पालुपद घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुरुवारी पुन्हा एकदा विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. आता ही मोहीम यापुढेही कायम राहील असा इशारा लोणावळा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.





