पिंपरी | ‘गुण पाहून नाही, आवड पाहून करियर निवडा’

लोणावळा, (वार्ताहर) – ‘तुम्हाला कोणत्या विषयात किती गुण मिळतात यावर तुमचं करियर निश्चित करू नका. तुमचा छंद, तुमची आवड लक्षात घेऊन करियर बाबत निर्णय घ्या. तुमची आवड तुमच्या प्रोफेशन मध्ये आणा आणि पालकांनी देखील आपल्याला पाल्याला त्यासाठी मदत करणे आवश्यक आहे,’ असे मत लोणावळा एयरफोर्स बेसचे विंग कमांडर बी.एस. आनंद यांनी व्यक्त केले. दिवंगत उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान आणि शहर शिवसेना परिवाराच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
लोणावळा शहरातील विविध शाळांमधून इयत्ता दहावीच्या वर्गात पाहिले तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कमांडर आनंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, माजी नगरसेविका श्रीमती सौम्या राहुल शेट्टी, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, सुरेश टाकवे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना विंग कमांडर बी.एस. आनंद म्हणाले की, भारतीय महिला सक्षम होत आहेत हे बघून आनंद होतोय. भारतीय सैन्यदलाच्या वायुसेना, नौसेना आणि पायदळ या तिन्ही विंग करियर घडविण्यासाठी चांगले मध्यम आहे. परंतु वर्दी घातल्यानंतरच आपण देशसेवा करू शकतो असे नाही.
आपल्या बुद्धीचा उपयोग देशासाठी करा. बाहेर देशात जाऊन आपले करियर करण्यापेक्षा देशासाठी काम करा, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र खराडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अजय ढम यांनी केले. उपस्थितांचे आभार सुनील इंगुळकर यांनी मानले.





