पिंपरी | सर्व पर्यटनस्थळांवरील बंदी हटवली !

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरासह मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली बंदी मंगळवारी (दि. ३० जुलै) दुपारी बारा वाजल्यापासून मागे घेण्यात आली आहे. पर्यटन बंदीच्या आदेशामुळे हैराण झालेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी बंदी हटविल्याच्या सुखद बातमीमुळे निश्वास सोडला असून यापुढे पुन्हा अशी बंदी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दिनांक २४ आणि २५ जुलै रोजी लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने २९ जुलैपर्यंत मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला होता. तदनंतर २६ जुलै रोजी पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली, त्यामुळे २७ तारखेला ही बंदी उठवण्यात आली.
मात्र बंदी उठविल्याची महिती नागरिकांपर्यंत पोहचत नाही तोच लगेच काही तासात पुन्हा एकदा पुढील अनिश्चित कालावधीसाठी पर्यटनस्थळांवर बंदी लागू करण्यात आली. प्रशासनाच्या या आदेशांमुळे स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या.
अखेर सोमवारी पर्यटन बंदीच्या आदेशाविरोधात लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने सल्लागार निखिल कवीश्वर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिर गवळीवाडा ते भुशी धरण अशी पदयात्रा काढणयात आली. त्याठिकाणी प्रांत अधिकारी यांचे प्रतिनिधी लोणावळा मंडल अधिकारी यांना सदरची बंदी उठवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन यांना निवेदन दिले होते. यासोबत लोणावळा जागरूक नागरिकचे किरण गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इमेल पाठवत बंदीमुळे नागरिकांचे जे हाल होत आहे, त्याची कल्पना दिली. आमदार सुनिल शेळके यांनी देखील प्रांताधिकारी यांना सोमवारी पत्र लिहित बंदी उठविण्याबद्दल सांगितले. तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी याबद्दल जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सोबत भाजपाने आंदोलनाचा इशारा दिला होता.
अखेर सर्व मान्यवरांनी आणि संघटनांनी पर्यटन स्थळांवरील बंदी हटविण्याची मागणी लावून धरल्याने जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. मंगळवारी सकाळीच सर्व पर्यटन स्थळांवर लागू केलेली बंदी मागे घेत असल्याचे आदेशपत्र प्रांतअधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला.





