पुणे जिल्हा | शास्त्रीय संगीत परीक्षेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश

पौड, (वार्ताहर) -काशिग येथील मृदंग ताल साधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या पखावज संगीत विशारद परीक्षेत उत्तम यश संपादन केले. गुरुकुलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी पखावज संगीत विशारद ही परीक्षा दिली होती सर्व विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.
गुरुकुलचा या परीक्षेतील निकाल शंभर टक्के लागला असून या यशाबद्दल गुरुकुलमधील विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक हभप शुभम महाराज शिंदे यांचे परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
काशिग येथील मृदंग ताल साधना गुरुकुलमध्ये मागील सात ते आठ वर्षांपासून मुळशी, मावळ व पुण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पखावज तसेच वारकरी सांप्रदाय परंपरेचे शिक्षण हे गुरुकुल पद्धतीने दिले जात आहे. त्यामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी हे गावोगाव जाऊन कीर्तन, भजन, हरिपाठ व पखावज वादन करुन आपली सेवा तर देत आहेतच.
शिवाय वारकरी सांप्रदायाची परंपरा व वारसा सुद्धा निष्ठेने पुढे नेत आहेत. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांस आध्यात्मिक, सांगीतिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण व संगणकीय शिक्षण सुद्धा दिले जात आहे. गावोगाव विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक व सांप्रदायिक शिक्षणाची व पखावज वादनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा प्रयोग करत असल्याची भावना गुरुकुलचे संस्थापक व शिक्षक शुभम महाराज यांनी व्यक्त केली.
एकूण सात परीक्षा
संगीत विशारद होण्यासाठी एकूण सात परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. मगच संगीत विशारद म्हणून प्रमाणपत्र मिळते. त्यामध्ये पुढील आणखी दोन परीक्षा दिल्यास संगीत अलंकार ही पदवी प्राप्त होते व मग कोणत्याही शैक्षणिक संस्थेत संगीत अलंकार म्हणून काम करता येते.





