वारं फिरलं..! मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला धक्का; १५ माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतणार?

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण २०१७ मध्ये शिंदे गटात गेलेले १५ माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत आहेत.
ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, या नेत्यांना पक्षात पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही हालचाल शिंदे गटाच्या मुंबईतील ताकदीवर परिणाम करू शकते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण ४६ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. यापैकी १५ जण आता परतण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला आहे. ठाकरे गटाने या नेत्यांना स्वीकारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. ही हालचाल BMC निवडणुकीत ठाकरे गटाला बळकटी देऊ शकते. सध्या ठाकरे गटाकडे ५५ आणि शिंदे गटाकडे ४४ माजी नगरसेवक आहेत.
ठाकरे गटातील नेत्यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत याबाबत भूमिका स्पष्ट केली. आमदार आणि खासदारांनी म्हटले की, “हे माजी नगरसेवक पक्षात परत येण्यास इच्छुक असल्याने त्यांना घेण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.” यामुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी आणि ठाकरे गटाकडून होणाऱ्या ‘रिवर्स इंगेजमेंट’मुळे महायुतीत तणाव वाढला आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या अलीकडील भेटीनंतर शिंदे गटानेही मुंबई जिंकण्यासाठी विशेष रणनीती आखली असली, तरी हे १५ नेत्यांचे परतणे त्यांना मोठा फटका ठरू शकते.





