पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर अपघात

वाल्हे (पुणे)- पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील कंटेनरने ट्रकला जोरात धडक दिल्याने ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. भैरवनाथ मंदिराजवळ ही घटना घडली. दुसऱ्या गाडीचालकालाही गंभीर दुखापत झाली आहे.
वाल्हे पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहितीनुसार, बुधवार (दि.16) रात्री दोनच्या सुमारास नीरा बाजूकडून जेजुरीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने जेजुरी बाजूकडून नीराकडे जाणाऱ्या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. यात ट्रक चालक सनी ऊर्फ संकेत लक्ष्मण इंगुळकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, वाल्हे पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस व स्थानिक युवकांनी जखमींना गाडीच्या बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी वाल्हे दूरक्षेत्रमध्ये संकेत यांचे भाऊ अनिकेत लक्ष्मण इंगुळकर यांनी कंटेनर चालक सिद्धेश्वर बबरूआन दहिफळे (रा. खडूसावरगाव. ता. परळी वैजनाथ. जि. बीड) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. तपास जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे दूरक्षेत्रातील हवालदार केशव जगताप, समीर हिरगुडे करीत आहेत.





