दिल्लीतील आप सरकार दिव्यांगांना देणार मासिक 5000 रुपये पेन्शन

नवी दिल्ली – दिल्ली सरकारने दिव्यांग व्यक्तींना मासिक मदत देण्याची घोषणा केली आहे. अशा दिव्यांगांना दिल्ली सरकार दरमहा 5 हजार रुपये देणार आहे. ही रक्कम संपूर्ण देशात सर्वाधिक आहे. समाजकल्याण मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ही माहिती दिली. भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेले दिव्यांग व्यक्ती या मासिक आर्थिक मदतीसाठी पात्र असतील. सोमवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ही योजना राबविण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाला देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. याअंतर्गत महिनाभरात नोंदणी सुरू होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. भारद्वाज म्हणाले की, माझा विश्वास आहे की या योजनेचा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्याची गरज नाही, कारण हा जनतेचा पैसा आहे जो त्यांच्याच कल्याणासाठी खर्च केला जात आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम्ही विशेष दिव्यांग लोकांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहोत. एवढी मोठी रक्कम देणारे दिल्ली हे देशातील एकमेव राज्य आहे. आमचे सरकार प्रामाणिकपणे काम करत असून दिल्ली सरकार तोट्यात चालत असल्याच्या अफवा पसरवणाऱ्या भाजपच्या आरोपांना आमचा निर्णय हे प्रत्युत्तर असल्याचे ते म्हणाले.
देशातील एकूण लोकसंख्येपैकी 2.1 टक्के लोक दिव्यांग –
2011 च्या जनगणनेनुसार, देशातील दिव्यांग व्यक्तींची संख्या 2.68 कोटी आहे, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 2.21 टक्के आहे. आरपीडब्लूडी कायदा, 2016 नुसार 21 प्रकारचे दिव्यांग आहेत. यामध्ये लोकोमोटर डिसॅबिलिटी, व्हिज्युअल डिसॅबिलिटी, श्रवण अक्षमता, वाक् आणि भाषेचे अपंगत्व, बौद्धिक अपंगत्व, एकाधिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, ड्वार्फिज्म इत्यादींचा समावेश आहे.





