“राज्यातील बोगस दिव्यांगावर होणार कारवाई”; तुकाराम मुंढे पुन्हा सक्रिय

मुंबई – डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. तुकाराम मुंढे जिथे जातात त्या विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात तसेच तेथील घोटाळे शोधण्याचा प्रयत्न करतात. दिव्यांग कल्याण विभागात आल्यानंतर त्यांनी दिव्यांगांच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस दिव्यांगांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तसे झाडाझडतीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दिव्यांग नसूनही त्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवून सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना चाप लावण्याचे काम दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सुरू केले आहे. यासाठी बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश 18 सप्टेंबर रोजी दिले आहेत.
राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांचे फायदे घेणाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचवेळी बोगस प्रमाणपत्र देणारे अधिकारीही घाबरले आहेत.
दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने त्यांच्या विशेष सुविधा, सवलत दिली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, काही लोक अधिकाऱ्यांशी संगनमत करून दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळतात आणि दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात. यामुळे खऱ्या दिव्यांगांचे नुकसान होते. म्हणूनच बोगस दिव्यांगाचा शोध घेऊन निधीचा विनियोग खऱ्या दिव्यांगांना घेता यावा, यासाठी बोगस दिव्यांगांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने व समाधानाने जगण्याचा अधिकार आहे. दिव्यांग नागरिकसुद्धा समृद्ध, समाधानकारक आणि सन्मानाने जगू शकतात. समाज आणि समुदाय म्हणून आपण त्यांच्याशी सन्मानाने व समानतेने वागणे आवश्यक आहे, अशी पोस्ट ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिली आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
सर्व 34 जिल्हा परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभरात पडताळणीचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर करायचा आहे. यात बोगस दिव्यांग आढळल्यास ते शिक्षेसाठी पात्र ठरतील. अशा दोषींना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अन्वये 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.





