Pune district : मांजरेवाडीमधील पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात

बाजार समितीच्या संचालकांनी दिले स्वतःचे मानधन
राजगुरुनगर – मांजरेवाडी गावातील पीडितेच्या कुटुंबाला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्याच्या संचालकांनी त्यांच्या मानधनातून आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
सहा महिन्यापूर्वी मांजरेवाडी गावातील एका नराधमाने 17 वर्षे मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला होता. आरोपीला फाशी व्हावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी राजगुरुनगर शहरात कॅण्डल मोर्च, मोर्चे काढले होते. मांजरेवाडी ग्रामस्थांनी गाव पातळी, जिल्हा पातळी व मंत्रालयापर्यंत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. कुटुंबाला मनोधैय योजनेतून आर्थिक मदतही मिळाली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, यासाठी मागणी केली होती. दरम्यान हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात फास्ट ट्रॅकवर सुरू झाला आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थ या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी त्यांच्या मानधनाची रक्कम पीडित कुटुंबाला दिलीं आहे. बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव सर्व संचालकांपुढे ठेवला होता.
त्याला संचालकांनी एकमताने निर्णय घेत मदत जाहीर केली. मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाकडे नुकताच सुपूर्त केला यावेळी सभापती विजय शिंदे पाटील, संचालक सुधीर भोमाळे, माजी उपसभापती सतीश राक्षे, मारूती सातकर, सरपंच वैभव गावडे, अमोल सांडभोर यांच्यासह पीडित कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते.





