Pune District : कुंडेश्वर अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सुचनेनुसार डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून धनादेश
राजगुरूनगर –खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे 11 ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 12 महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर 28 महिलासह 4 मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्हे यांचेकडुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे.
खेड तालुक्यातील पाईटच्या पापळवाडी महिलांच्या दुर्घटनेनंतर डॉ. गोर्हे यांनी स्वतः मृतांच्या नातेवाईकांना भेटून सांत्वन केले. मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल, खेडमधील सुश्रुत आणि शिवतीर्थ हॉस्पिटल्समध्ये जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. पापळवाडी येथे शोकाकुल कुटुंबांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या सर्वतोपरी सहकार्याची हमी दिली होती. त्यानुसार तातडीने पावले उचलत आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
डॉ. नीलम गोर्हे यांच्या संवेदनशील आणि त्वरित हस्तक्षेपामुळे पीडितांना स्वनिधीतून केवळ आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधार मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या उपाययोजनांनी शासनाची संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा दिसून येते. कुंडेश्वरच्या या दु:खद घटनेत गमावलेल्या जीवांना परत आणता येणार नाही, परंतु डॉ. गोर्हे यांच्या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबांना आर्थिक स्वरुपात दिलासा आणि आधार मिळाला आहे.
सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना
डॉ. गोर्हे यांनी राजगुरुनगर येथे तातडीची शासकीय अधिकार्यांची बैठक घेऊन अपघातस्थळी धोकादायक वळणावर संरक्षक भिंत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याचे आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या कारवाईमुळे भविष्यातील संभाव्य अपघातांना आळा बसेल, असा विश्वास डॉ. गोर्हे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.





