Junnar News : शिवसेनेकडून शब्द पूर्ण! शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत
Junnar News : जुन्नरमधील इनामदार कुटुंबाच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; शेततळ्यात बुडालेल्या दोन मुलांच्या निधनानंतर ५ लाखांची आर्थिक मदत.

Junnar News – जुन्नरमधील एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला मदतीचा शब्द पाळला आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने या पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
गतवर्षी २२ नोव्हेंबर रोजी आफान इनामदार (वय १०) आणि रिफद इनामदार (वय ७) हे बहीण-भाऊ खेळायला गेले असताना शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मुलांचे वडील वेल्डिंगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुन्नर दौऱ्यावर असताना त्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते आणि मदतीचे आश्वासन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करत शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, आमदार शरद सोनवणे आणि युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते ही आर्थिक मदत इनामदार कुटुंबाला देण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक मयूर महाबरे, समीर पुरवंत, श्रीकांत जाधव, रिझवान पटेल, दर्शन फुलपगार, सचिन वाळुंज, अक्षय काळे यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर या कुटुंबाचे इतर प्रश्नही प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.





