देव तारी त्याला कोण मारी…! कुत्री मागे लागल्याने तरुण पडला विहिरीत; दोन दिवस उपाशीपोटी अडकला

जालना : एका तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले. त्याच्यापासून बचाव करत पळत असताना हा तरुण खोल विहिरीत पडला. दोन दिवस दोन रात्र विहिरीतील दोरीला धरून त्याने स्वःतचा जीव वाचविला. ग्रामस्थ, पोलिसांच्या मदतीने त्याला विहिरीबाहेर सुखरूप काढल्याने त्याचा जीव वाचला. जालना जिल्ह्यातील वाढवणा येथील पिशोर गावात घडली आहे. नातलगाकडे आलेल्या तीस वर्षीय तरुणावर चांगलाच प्रसंग ओढावला. संदीप ओंकार घटकवडे (वय ३०) असे तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
संदीप घटकवडे हा तरुण पिशोर येथील नातलगाकडे सोमवारी (दि. २४) आला होता. मंगळवारी एकाकडे काम निघाल्याने तो त्याच्या शेतात गेला. मंगळवारी संध्याकाळी परत येत असताना तो रस्ता चुकला. त्याचवेळी त्याच्या पाठीमागे अचानक भटके कुत्रे लागले. त्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी तो पळत असताना एका विहिरीत पडला. ही विहीर ८५ फूट खोल असून, त्यात १५ ते २० फूट पाणी आहे.
कसाबसे पोहत त्याने विहिरीतील एका दोरीला व पाईपला धरले. मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु ही विहीर निर्मनुष्य जागेत असल्याने कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. दोरीला धरून विहिरीत त्याने दोन दिवस व दोन रात्र उपाशी पोटी काढल्या. गुरुवारी (दि. २७) दुपारी दोन, तीन मुले मोहळ शोधाण्यासाठी या विहिरीजवळून गप्पा मारत जात होते.
त्यांचा आवाज संदीपला ऐकू आला. त्याने जीवाच्या आकांताने पुन्हा आवाज दिला. विहिरीतून कोणाचा आवाज येत असल्याचे त्या मुलांच्या लक्षात आले. त्यांनी गावात ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने संदीपला तिसऱ्या दिवशी सुखरूप बाहेर काढले.





