बीड : शेतकऱ्याने शेतातील फळझाडे व गुरांसाठी राखून ठेवलेले विहिरीतील पाणी शुक्रवारी (25 एप्रिल) रात्री चोरट्यांनी 3 टँकर लावून रातोरात लंपास केले. हा प्रकार बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी गावात उघडकीस आला. याबाबत शेतकऱ्याच्या मुलाने भावनिक पोस्ट करत व्यथा मांडली. साक्षाळपिंपरीत शेतकरी त्र्यंबक काशीद यांचे शेत असून शेतात विहीर आहे. आंब्याची ३५५ झाडे जगवण्यासाठी व गुरांना उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी त्यांनी विहिरीत पाणी साठवून ठेवले होते. सध्या विहिरीत अडीच परस पाणी शिल्लक होते. शेतकऱ्याचा मुलगा हरी काशीद हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो, तर शेतकरी दांपत्य दोन दिवसांपासून शेतात गेले नव्हते. ही संधी साधत पाणीचोरांनी शुक्रवारी विहिरीतील 3 टँकर पाणी लांबवले, तर एक टँकर पाणी शेतात सोडून देत पाण्याची नासाडी केली. चोरांनी रात्री शेतात येऊन वीजपंपाच्या स्टार्टर पेटीचे कुलूप तोडले. नंतर वीजपंप चालू करून विहिरीतील पाणी टँकरमध्ये भरले. उर्वरित पाणी शेतात सोडून दिले. साक्षाळपिंपरी अडीच हजार लोकसंख्येचे गाव असून पौंडूळ धरणाच्या खाली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विहीर आहे. सध्या या विहिरीची पातळी खालावली आहे. त्यामुळे गावात 22 दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. …तर मोफत दिले असते विहिरीतील पाणी ही चोरण्याची बाब नाही. आम्हाला विचारून कुणी पाणी मागितले असते तर त्याला मोफत दिले असते. गावापासून लांब अंतरावर विहीर असलेल्या शेतकरी बांधवांनी अशा लोकांपासून सावध राहावे, असे आवाहन करत शेतकऱ्याचा मुलगा हरी काशीद याने पोस्टद्वारे केले.