Hingoli Well Scam: विहीर चोरीला गेली! हिंगोलीत मोठा घोटाळा उघड; संतप्त शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन
Hingoli Well Scam:

Hingoli Well Scam: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर झालेली सिंचन विहीर केवळ कागदावरच पूर्ण दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज, शुक्रवारी (१३ मार्च) विठ्ठल तिडके यांच्या ६० फूट खोल विहिरीत उतरून ‘विहीर आत्मक्लेश’ आंदोलन पुकारले.
काय आहे घोटाळा?
शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतात मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाल्याचे दाखवून १ लाख ७५ हजार ७२४ रुपयांचा निधी उचलण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शेतात विहिरीचा साधा खड्डाही खोदण्यात आलेला नाही. खोटे जिओ-टॅगिंग करून आणि केवळ कागदोपत्री घोडे नाचवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. गरिबांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या रॅकेटमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
आगळेवेगळे आंदोलन
भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आगळावेगळा मार्ग निवडला. शुक्रवारी सकाळीच शेतकरी विठ्ठल तिडके यांच्या ६० फूट खोल विहिरीत ५० फुटांवर बाजा टाकून खाली उतरले आणि तेथे बसूनच घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनात श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, विनोद खडसे, रुस्तुमा होळपादे, बळीराम रवणे, प्रल्हाद गबारे, माधव खडसे आणि गौरव पाळते हे शेतकरी सहभागी झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुखही उतरले विहिरीत
आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. केवळ भेट न देता त्यांनी स्वतः ५० फूट खोल विहिरीत उतरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे आंदोलनाला मोठी धार चढली असून परिसरात याची मोठी चर्चा रंगली आहे.
आरोपी अद्याप मोकाट
या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. ६ मार्च रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही संबंधित दोन आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. आरोपींना अटक न झाल्यास सरकारी दस्तऐवज आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यातील पुण्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या घोटाळ्याला खतपाणी घालणाऱ्या पंचायत समितीच्या वरिष्ठ दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारांतर्गत नवीन विहीर मंजूर करावी, अशा या मागण्या आहेत. ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून या घोटाळ्याचे धागेदोरे संपूर्ण तालुक्यात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रावर दुहेरी हवामान संकट; उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा तडाखा







