Nanded News : रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळली

नांदेड : रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या रुई गावात घडला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करताना न्याय देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विहीर महिनाभरातच ढासळल्यानं कामाच्या कार्यपद्धतीसह, विहीर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या मालवर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
नायगांव तालुक्यातील रुई येथील कामाजी मुकादम या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्याला शासनाच्या अनुदानाचा रुपयाही अद्याप मिळाला नाही. या शेतकऱ्याने जवळच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले, पण अचानकपणे विहीर ढासळल्याने या शेतकऱ्याचे साडे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी करुन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
विविध कारणामुळे आधीच शेतकरी चिंतेत
विविध कारणामुळे आधीच शेतकरी चिंतेत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच पुन्हा अशी संकट येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई देखील पाहायला मिळत आहे. अशा काळात शेतकरी पाण्याची व्यवस्था करण्याचे काम करताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.





