Team India : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टीम इंडिया’च्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद; पाकिस्तानला टाकलं मागे…

Indian Cricket Team’s T20 International Record : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत विजयी आघाडी घेतली आणि यासह आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला. सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विशेष आकडा गाठला, जेव्हा रायपूरमध्ये चौथ्या टी-20 सामन्यात मेन इन ब्लू संघाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला.
आता टीम इंडियाने सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने आतापर्यंत एकूण 213 T0 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 136 जिंकले आहेत आणि 67 गमावले आहेत. तर पाकिस्तानने 226 पैकी 135 सामने जिंकले असून 82 सामने गमावले आहेत. हा विक्रम भारत-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर होता. मात्र मालिकेतील चारपैकी तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने विक्रमावर आपले नाव कोरले आहे.
A special win in Raipur 👏#TeamIndia now has the most wins in Men’s T20Is 🙌#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/edxRgJ38EG
— BCCI (@BCCI) December 1, 2023
त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान नंतर, न्यूझीलंडचा संघ सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी 200 पैकी 102 सामने जिंकले आहेत आणि 83 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर पुढे ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. 182 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 95 सामने जिंकले आहेत तर 79 सामने गमावले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 171 पैकी 95 सामन्यात विजय आणि 72 सामन्यात पराभव पत्करला आहे.
दरम्यान, टीम इंडियाने रायपूर येथे झालेल्या चौथ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला.





