पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून मीटरद्वारे आकारण्यात येणाऱ्या पाण्याच्या बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी आता या बिलावर दंड आकारण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे.
महापालिकेच्या पाण्याची बिलांची थकबाकी सुमारे ६०० कोटींवर गेली असून, महापालिकेकडून थकबाकीदारांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने नागरीक ही बिले भरत नाहीत.
त्यामुळे मिळकतकराच्या धर्तीवर पाण्याच्या बिलावर प्रतिमहिना १ टक्के दंड आकारला जाणार आहे. महापालिकेकडून व्यावसायिक व काही निवासी ग्राहकांना सन २००० पासून मीटरद्वारे बिलाची आकारणी होत आहे. तसेच खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नसल्याने थकबाकी वाढली आहे. या वसुलीसाठी पालिकेकडून नोटीस वजावल्या जात असल्या, तरी नागरिक प्रतिसाद देत नसल्याने महापालिकेने आता थेट पाणी बिलावर शास्ती आकारणीचा निर्णय घेतला आहे.
अशी असेल आकारणी
मीटर बिलाच्या दिनांकापासून ६० दिवसांत बिल भरणे अपेक्षित असणार आहे. हे बिल न भरल्यास थकबाकी रकमेवर प्रतिमहा १ टक्का दराने दंडात्मक व्याज आकारले जाईल हा निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने ३१ जानेवारी २०२४ पर्यंतची थकबाकी भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत आहे.