Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ एक दिवस उपोषण.! अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले पाहा…
दिल्लीच्या जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना कलाविश्वातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

Atul Kulkarni – दिल्लीच्या जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना कलाविश्वातून मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी वांगचुक यांच्या समर्थनार्थ गुरुवारी त्यांच्या घरी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा केली.
रंग दे बसंती फेम अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, सोनम वांगचुक आणि त्यांचे सहकारी ज्या वेदनेतून जात आहेत, त्या वेदनेशी मला जोडले जायचे आहे. वेदनेचे नाते वेदनेशी जोडले जाणे गरजेचे आहे. मी सरकारला त्यांची संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन करण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करत असून, लोकांनीही यात सहभागी व्हावे.
अतुल कुलकर्णी यांच्या व्यतिरिक्त झीनत अमान, शबाना आझमी, सोनी राझदान, अनुराग कश्यप, अभय देओल आणि ओमी वैद्य यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.





