Rahul Gandhi : “ज्ञानेश कुमार यांच्याकडून आपल्याला संदेश….”; राहुल गांधींचा अमेरिकेत खळबळजनक दावा
मुख्य निवडणूक आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणात साक्षीदार म्हणून पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
निवडणूक आयोगातील काही वरिष्ठ अधिकारीच सध्याच्या व्यवस्थेतील घडामोडींना कंटाळले असून, आयोगाच्या अंतर्गत बाबींची माहिती विरोधकांपर्यंत पोहोचवत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आता विरोधक अधिक मोकळेपणाने आपली भूमिका मांडत आहेत. निवडणूक आयोगातूनच आपल्याला अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही वरिष्ठ अधिकारी सध्याच्या परिस्थितीला कंटाळले असून, ‘आम्हाला यापुढे या गोष्टी पुढे नेता येणार नाहीत’, अशा भावना व्यक्त करत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत विधान केले होते. ऑक्टोबर महिन्यात पत्रकारांशी संवाद साधताना ज्ञानेश कुमार यांच्याकडून आपल्याला संदेश येत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणात साक्षीदार म्हणून पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. राजीनामा देऊन त्यांनी पदावरून बाजूला व्हावे, असे सूचक विधानही राहुल गांधी यांनी केले होते.
निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नाही :
शिकागो येथील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षांनी निवडणुका लढवणे थांबवले, तर भारतीय लोकशाहीवरील जनतेचा विश्वास संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.
त्यामुळे निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याऐवजी व्यवस्थेतील त्रुटी जनतेसमोर आणणे आणि प्रत्येक निवडणुकीत लढा देणे, हीच काँग्रेसची रणनीती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






