Nagar | काँग्रेसच्या आ.लहू कानडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना पक्षने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात कानडे यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याबाबत अजून महायुतीच्या नेत्यानी अधिकृत घोषणा केली नाही.
दरम्यान शिवसेना पक्षाची ही जागा असून या ठिकानाहून इच्छुक असलेले मा. खा. सदाशिव लोखंडे व मा. आ.भाऊसाहेब कांबळे कोणता निर्णय घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
श्रीरामपूर येथून काँग्रेसने विधानसभेसाठी आ. लहू कानडे यांचे तिकीट कापून हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज कानडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.मुंबई येथे झालेल्या या प्रवेशवेळी अशोक कानडे,अमृत धुमाळ,अरुण पाटील नाईक आदींसह निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक यांच्या कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
श्रीरामपूर मतदारसंघात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत.ही निवडणूक आता अगदीच वेगळ्या वळणावर पोचली आहे. ही जागा महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असतानाही ती आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडे जाते काय याविषयी अधिकृत घोषणा बाकी आहे. महायुतीत शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक होती.
त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी ही जागा शिवसेनेने ही जागा सोडली का ? याविषयी अजून माहिती पुढे येणे बाकी आहे.आता आमदार लहू कानडे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणुकीला समोरे जाणार असून ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित राहणार आहेत.





