Satara: शंभरहून अधिक सदस्यांच्या कुटुंबाचा एकत्रित गणेशोत्सव
Satara सातार्यातील मोहिते कुटुंबाच्या तीन पिढ्या जोपासतात परंपरा

Satara: सातार्याच्या छत्रपतींच्या घराण्याशी संबंधित असलेल्या मोहिते कुटुंबामध्ये शंभरहून अधिक सदस्य असले, तरी गणेशोत्सव एकत्र साजरा करण्याची परंपरा या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून जपली आहे. कोकणातून सातार्यात आलेल्या खासेराव मोहिते यांनी सर्वप्रथम गणेशाची स्थापना केली. त्यांची 11 मुले आणि दोन मुलींनी ही परंपरा पुढे नेली. त्यानंतरच्या पिढीनेही आपल्या पूर्वजांची ही परंपरा आणि प्रथा जोपासली आहे.
या कुटुंबाच्या गणरायाची प्रतिष्ठापना माची पेठेत विद्यमान नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या निवासस्थानी केली जाते. त्यांचे 22 चुलत बंधू, त्यांची मुले, सुना, नातवंडे असे कुटुंबातील शंभरहून सदस्य या उत्सवात तन- मन- धनाने सहभागी होतात. मूळचे कोकणातील किंजळ (ता. संगमेश्वर) येथील खासेराव मोहिते 1912- 13 च्या दरम्यान सातार्यात आले. ते छत्रपती शाहू महाराज (दुसरे) यांचे कारभारी म्हणून काम पाहात होते. त्यांनी माची पेठेतील आपल्या घरी गणेशोत्सवात बाप्पांची प्रतिष्ठापना केली.
त्यांची 11 मुले आणि दोन मुलींनी विवाह झाल्यानंतरही गणेशोत्सव एकत्र साजरा करण्याची परंपरा जपली. आता तिसर्या पिढीतील सदस्यदेखील एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमून उत्सवाचे नियोजन करतात. उत्सवात काय करायचे, गौरी आगमनानंतर सजावट, नैवेद्यासाठी कोणकोणते पदार्थ तयार करायचे, याची जबाबदारी प्रत्येकावर सोपवली जाते. त्याप्रमाणे सर्व जण आपापल्या जबाबदार्या पार पाडून, गणेशोत्सव साजरा करतात.





