Satara: गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे दरे गावात; शेतात बांबूची लागवड करत दिला पर्यावरणाचा संदेश
Satara पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मूळ गावी दरे येथे गणेशोत्सवासाठी हजेरी लावली. शिंदे यांनी आपल्या शेतात विविध वृक्षांसह बांबूच्या रोपांची लागवड केली. ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या हवामानामुळे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसाचे प्रमाण कमी होणे तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानातील हे बदल गांभीर्याने घेण्याची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बदलत्या हवामानाचा परिणाम जगभर जाणवत असल्याचे सांगताना शिंदे यांनी नेपाळमधील पूरस्थिती तसेच हिमनद्या वितळण्याच्या घटनांचा संदर्भ दिला. निसर्गाचा समतोल बिघडल्यास त्याचे परिणाम मानवी जीवनावरही होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजकीय वर्तुळातील त्यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत शिंदे यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. ‘मी गावी आलो तरी लोक नाराज होतात, दिल्लीला गेलो तरी चर्चा होते आणि लंडनला गेलो तरी चर्चा होते.’ जातो ते कामासाठी, असे सांगत त्यांनी इंग्लंड दौऱ्याचा संदर्भही दिला. महाराष्ट्राची भूमिका, राज्यातील विविध प्रकल्प, विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी या दौऱ्यात मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘त्यांच्या’साठी एखादं झाड शोधतो
आपल्याबाबत कोण काय बोलते किंवा कोणाला काय वाटते, याकडे लक्ष देत नसल्याचेही स्पष्ट तरत शिंदे यांनी विरोधकांच्या ‘पोटदुखी, जळजळ आणि मळमळी’वर मिश्कील टोला लगावला. ‘त्यांच्यासाठीही एखादं झाड शोधतो,’ अशी टिपणी त्यांनी केली.





