Satara: समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा; ऋषिकेश धायगुडे -पाटील
Satara अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. २६ ऑक्टोबर असल्याची माहिती समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे- पाटील यांनी दिली.

Satara: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद सेसमधून दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय व्यक्तीकरता वैयक्तीक लाभाच्या योजनांसंदर्भात लाभार्थ्यांकडून दि. २१ सप्टेंबरपासून काही योजनांसाठी ऑफलाइन तर काही योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. २६ ऑक्टोबर असल्याची माहिती समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे- पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद ५ टक्के दिव्यांग स्वनिधीमधील योजनेसाठी ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. पायाचा अस्थिव्यंग असलेल्या ९६ दिव्यांगास तीनचाकी स्कूटर पुरविणे, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या ४० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप देणे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील २६० दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य, २८५ दिव्यांगाना निर्वाह भत्ता, मतिमंद विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी अर्थ सहाय्य, १९५ दिव्यांग लाभार्थीना झेरॉक्स मशीन खरेदी अर्थसहाय्य पुरवणे, ५० दिव्यांग लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करणे व सौरसंच बसवण्यास अर्थ सहाय्य करणे, १२ दिव्यांग विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे अशा २० टक्के मागासवर्गीय स्वनिधीमधील योजनांसाठी ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असल्याचे धायगुडे- पाटील यांनी सांगितले.
मागासवर्गीय लाभार्थ्यास झेरॉक्स मशिन अनुदान योजना, पाचवी ते बारावी मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविणे, पाचवी ते बारावी मागासवर्गीय मुलांना सायकल पुरवणे, यशवंत घरकूल योजनेचा १०० लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. दिव्यांग विभागाच्या ऑनलाइन योजनांसाठी अर्जदाराने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व दिले जाणारे अनुदान याबाबतचा तपशिल https:/www.zpsatarascheme.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनांसाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदारांची समाजकल्याण समितीमार्फत निवड केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी दि. २६ ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन ऋषिकेश धायगुडे- पाटील व समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.





