Satara: ‘विषमुक्त स्वयंपाकघर’ साठी झेडपी अध्यक्षा ऑन फिल्ड; जनजागृतीसाठी शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्याचा डॉ. प्रिया शिंदे यांचा प्रयत्न
Satara दिवसभर जिल्हा परिषदेतील महत्वपूर्ण बैठका संपवून, भेटायला आलेल्या सर्वसामान्य जनतेची, कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावून डॉ. प्रिया शिंदे गावोगावी महिलांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहेत.

Satara: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी डॉ. प्रिया शिंदे यांचा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
दिवसभर जिल्हा परिषदेतील महत्वपूर्ण बैठका संपवून, भेटायला आलेल्या सर्वसामान्य जनतेची, कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावून डॉ. प्रिया शिंदे गावोगावी महिलांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहेत. गाव छोटं असो वा मोठं. जाईल तिथं एकत्र जमलेल्या महिलांशी आणि युवकांशी आपुलकीने त्या संवाद साधत आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या विषमुक्त अन्नावर त्या मार्गदर्शन करत आहेत. अतिशय तळमळीने आणि तितक्याच अभ्यासूपणे ओघावत्या शैलीत ‘काय खावं आणि काय खाऊ नये,’ याविषयी त्या बोलू लागतात, त्यावेळी उपस्थित सर्वांनाच अचंबित व्हायला होत आहे.
आजपर्यंत जनतेचा अनुभव वेगळा होता, मोठमोठे नेते येतात तितकीच मोठमोठी भाषणे ठोकतात, हारतुरे स्वीकारतात आणि निघून जातात. पण इथं काहीतरी वेगळं घडत असल्याच्या भावना जनमानसातून पुढे येत आहेत. कसलाही तामझाम नाही, डामडोल नाही. इथं आहे तो फक्त आपुलकीचा आणि निरोगी आरोग्याचा संवाद. तोही महिलांशी. घरात आरोग्याच्या समस्या निर्माण व्हाव्यात, असे कुठल्याच गृहिणीला वाटत नाही. पण कधी कधी अज्ञानामुळे, अपुऱ्या माहितीमुळे, अजाणतेपणात काही गोष्टी होऊन जातात. त्यामुळे अजूनही आहाराबाबत जनजागृतीची अत्यंत निकड आहे आणि हे काम फक्त हुकूम सोडून करायचं नाही तर स्वतः फिल्डवर उतरून खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यायची, अशा मानसिकतेतून डॉ. प्रिया शिंदे रोज खेडोपाडी फिरत आहेत.
डॉ. शिंदे गावोगावी रोज हजारो महिलांना भेटत आहेत. विषमुक्त स्वयंपाकघर ही संकल्पना त्या गावोगावी प्रभावीपणे मांडत आहेत. श्री काडसिद्धेश्वर महाराज आणि आमदार महेश शिंदे यांच्या स्वप्नातील मतदारसंघ हा फक्त भौतिक सुविधांनी संपन्न न करता, संपूर्ण मतदारसंघ आरोग्यसंपन्न केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. यासाठी सौ. शिंदे अविरत कष्ट घेताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाची आता खरी गरज आहे. आपण सर्वांनी या चळवळीत झोकून देण्याची गरज आहे. तुमच्या… माझ्या कुटुंबापासून सुरुवात करूया… आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा या विषमुक्त स्वयंपाकघर या अभियानाशी जोडून घेऊया आणि संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण करूया.





