बाप्पांच्या विसर्जनाची वैभवशाली मिरवणूक; मानाच्या आणि प्रमुख मंडळांची जय्यत तयारी

पुणे – गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी पुण्यातील भक्तगण सज्ज झाले आहेत. गुरूवारी (दि.28) सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. यंदाही मानाच्या आणि अन्य प्रमुख गणपती मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथके, बॅंड, ध्वजपथक या शिवाय विविध संस्था, संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन त्यांनी तयार केले आहे.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती
पारंपरिक चांदीच्या पालखीतून ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी उत्सव मंडपातून लोकमान्यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ होणार आहे. ठीक साडेदहा वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होईल. नगारावादन, प्रभात बॅंड, कामायनी प्रशाला, बॅंक ऑफ इंडियाचे पथक सहभागी होणार आहे. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद ऐकायला मिळणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरुन पालखी वाहणार आहेत.
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ कार्यकर्ते हे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपती मिरवणुकीचे आकर्षण असेल. सतीश आढाव यांचे नगारावादन, समर्थ प्रतिष्ठान आणि ताल ढोल-ताशा पथकांचे वादन, चांदीच्या पालखीपुढे विष्णूनाद पथकाचे शंखनाद असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ साकारला आहे. न्यू गंधर्व ब्रास बॅंडचे वादक हनुमान चालीसा आणि “मंगल भवन अमंगल हारी…’ या रामायण चौपाईचे वादन करणार आहेत.
मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम गणपती
स्वप्नील आणि सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी साकारलेल्या जय श्रीराम “रामराज्य’ या आकर्षक पुष्परथामध्ये विराजमान गणरायाची मूर्ती हे मिरवणुकीचे आकर्षण असेल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व बॅंडपथक, फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके तसेत ढोल- ताशा पथकांचे वादन ऐकायला मिळेल. नादब्रह्म आणि नादब्रह्म ट्रस्ट या दोन ढोल-ताशा पथकांचा निनाद दुमदुमणार आहे.
मानाचा चौथा : श्री तुळशीबाग मंडळ गणपती
यंदा “महाकाल’ रथातून श्री तुळशीबाग गणपतीची मिरवणूक निघणार आहे. 28 फूट उंचीच्या रथामध्ये फुलांनी सजवलेली 12 फूट उंचीची महाकाल पिंड असेल. लकडी पुलाजवळील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने यंदा पहिल्यांदाच रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या सवारीची आठवण या मिरवणुकीने होईल. यात उज्जैनचे अघोरी महाराज यांचा सहभाग असेल. लोणकर बंधूंचे नगारावादन, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहे.
मानाचा पाचवा : श्री केसरीवाडा गणपती
टिळक पंचांगानुसार दि. 17 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना झालेल्या केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला गुरुवारी होणार आहे. फुलांनी सजवलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेश मूर्ती विराजमान असणार आहे. बिडवे बंधूंच्या नगारावादनासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. तर इतिहास प्रेमी मंडळाकडून “चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा देखावाही आकर्षणाचे केंद्र असेल.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट गणपती
फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी रथात विराजमान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांचे वादन आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. समर्थ पथक, रमणबाग प्रशाला आणि श्रीराम ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहे. तर त्यासोबतच मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके पाहावयास मिळतील. पारंपरिक पेहरावात कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
अखिल मंडई मंडळ
कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर यांनी साकारलेल्या “विश्वगुरू’ रथामध्ये विराजमान अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेनुसार सुरू होईल. श्री स्वामी समर्थ यांची दहा फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराज यांचे थ्री-डी चित्र रथावर साकारण्यात आले आहे. “कर्दळी वनात वाळूतून प्रगट झालेले श्री स्वामी समर्थ’ अशी सजावटीची संकल्पना असून विद्युत रोषणाईने रथ उजळून निघेल. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, लकडी पुलावर रथाची उंची 15 फूट होणार आहे. जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन, गंधर्व बॅंडपथक, तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह आणि नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टचे वादन ऐकायला मिळेल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत “श्री गणाधीश रथा’मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असेल. प्रभात, दरबार ही बॅंडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा असेल. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेत यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू होणार असून लक्ष्मी रस्त्याने गणपती मार्गस्थ होईल, अशी माहिती मंडळाने दिली.





