Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 1) : राहणे, श्रेयस, सर्फराजची अर्धशतके; शेष भारताविरूध्द मुंबई सुस्थितीत….

लखनौ :- इराणी ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया हे संघ आमनेसामने आले आहेत. रणजी ट्रॉफी विजेता संघ आणि रेस्ट ऑफ इंडियाचे खेळाडू या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. मागच्या पर्वात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं होतं. दुसरीकडे, शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली आहे.
आजपासून सुरू झालेल्या लढतीत कर्णधार अजिंक्य राहणे, श्रेयस अय्यर व सर्फराज खान यांनी अर्धशतके झळकाविताना इराणी चषक स्पर्धेत मुंबई संघाला सुस्थितीत आणले. शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. मुंबई संघाने पहिल्या दिवशी 68 षटकांत 4 बाद 237 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवस अखेर अजिंक्य राहणे 86 (6 चौकार, 1 षटकार) धावांवर तर सर्फराज खान 54 (6 चौकार) धावांवर खेळत आहेत. शेष भारत संघाकडून मुकेश कुमारने 3 तर यश दयालने 1 गडी बाद केला.
Stumps on Day 1!
A fantastic recovery for Mumbai, courtesy of captain Ajinkya Rahane (86*), Shreyas Iyer (57) and Sarfaraz Khan (54*).
From 37/3 they have moved to 237/4.
Mukesh Kumar picked up 3 wickets.#IraniCup | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/Er0EHGOrUJ pic.twitter.com/wjszlLBjEW— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 1, 2024
मुंबई संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ तिसऱ्याच षटकांत तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक तामोरे देखील परतला. हार्दिकला भोपळा देखील फोडता आला नाही. मुंबईची अवस्था 2 बाद 06 अशी झाली. दुसरा सलामीवीर आयुष म्हात्रे व कर्णधार अजिंक्य राहणे यांची जोडी जमली असे वाटत असताना आयुष्य मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबई संघाने 37 धावांत 3 आघाडीचे फलंदाज गमावले.
आयुष परतल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यर सोबत अजिंक्य राहणेने 102 धावांची भागीदारी केली. एका बाजूने अजिंक्य राहणेने एकेरी – दुहेरी धावा जमवायला सुरुवात केली. खराब चेंडूवर फटके देखील मारले. श्रेयस अय्यरने 80 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच रहाणेने देखील 103 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर श्रेयस 57 धावा काढून परतला. त्याने या खेळीत 6 चौकार व 2 षटकार लगावले. त्यानंतर आलेल्या सर्फराज खान सोबत अजिंक्यने अजून पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 237 पर्यंत नेली.





