Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 2) : सर्फराजचं नाबाद द्विशतक, शेष भारताविरूध्द मुंबई मजूबत स्थितीत…

Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 2) : लखनौमध्ये शेष भारत (रेस्ट ऑफ़ इंडिया)आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या इराणी ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी सर्फराज खानने (Sarfaraz Khan) 221 धावांची खेळी केली आणि तो नाबाद राहिला. सरफराजच्या या द्विशतकाच्या जोरावर मुंबई संघाने नऊ गडी गमावून 536 धावांपर्यंत मजल मारली आहे. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि प्रसिध कृष्णा या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर सारांश जैनने 1 विकेट घेतली.
मंगळवारी पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे (86) व सर्फराज खान (54) यांनी दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. अजिंक्य रहाणे कालच्या 86 धावांमध्ये 11 धावांची भर घालून परतला. त्याने 97 धावांची खेळी केली. याखेळीत त्याने 7 चौकार व 1 षटकार लगावला. त्यानंतर आलेला शम्स मुलाणी (5) झटपट माघारी परतला. त्यानंतर सर्फराज आणि तनुष कोटियन यांनी सातव्या गड्यासाठी 254 चेंडूत 183 धावांची भागीदारी केली. यामध्ये सर्फराजने 111 धावांचा तर तनुषने 31 धावांचा वाटा उचलला.
तनुषने 124 चेंडूचा सामना करताना 6 चौकारांच्या साहाय्याने 64 धावांची खेळी केली. दरम्यान सर्फराजने देखील 149 चेंडूत शतक पूर्ण केले. तनुष बाद झाल्यानंतर सर्फराजने शार्दूल ठाकूर सोबत 73 धावांची भागीदारी केली. शार्दूल मैदानात असतानाच सर्फराज 253 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या. शार्दूल ठाकूर बाद झाल्यानंतर सर्फराज खान व मोहम्मद जुनेद खान यांनी अजून पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर सर्फराज 221 तर मोहम्मद जुनेद खान 0 धावांवर खेळत होते.
ICC Test Rankings : कोहली-जैस्वालची क्रमवारीत मोठी झेप तर रोहित-पंतची झाली घसरण…
सरफराजचे ऐतिहासिक द्विशतक….
सरफराजचे हे द्विशतक उत्कृष्ट तसेच ऐतिहासिक होते, कारण याआधी इराणी चषक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने द्विशतक झळकावले नव्हते. याआधी रवी शास्त्री, वसीम जाफर, यशस्वी जैस्वाल यांनी इराणी चषकात निश्चितपणे द्विशतके झळकावली आहेत, परंतु ते त्यावेळी भारताच्या उर्वरित संघाकडून (रेस्ट ऑफ इंडिया) खेळत होते.





