Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, MCA ने केली मोठी घोषणा…

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने शेष भारत संघाचा पराभव करुन तब्बल 27 वर्षांनंतर इराणी चषक उंचावला. या कामगिरीनंतर मुंबईच्या रणजी संघाला मुंबई क्रिकेट असोसिएशन 1 कोटी रुपये देणार आहे. लखनौ येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील रणजी चॅम्पियन मुंबई संघाने ट्रॉफी जिंकली.
याआधी, मुंबईच्या संघाने शेवटच्या वेळी 1997 मध्ये शेष भारताला हरवून हा इराणी चषक जिंकला होता. बीसीसीआयच्या 50 लाख रुपयांच्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांनी सोमवारी झालेल्या सत्कार समारंभात 1 कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षीस रकम देणार असल्याची घोषणा केली.
Our 𝓒𝓗𝓐𝓜𝓟𝓘𝓞𝓝𝓢 were felicitated by President Mr. @ajinkyasnaik, Vice President Mr. @madhukar_sanjay, Secretary Mr. @hadap_abhay, Jt. Secretary Mr. Deepak Patil, Treasurer Mr. Arman Mallick, and other Apex Council members. 🙌#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/0zHnnTtI5r
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 8, 2024
नेहमीप्रमाणे रणजी करंडक स्पर्धेतील विजेता संघ विरुद्ध शेष भारत अशी लढत झाली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचा फायदा झाला. अखेरच्या दिवशी मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि मोहित अवस्थी यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी तनुष कोटियनने शानदार शतक झळकावून सामना अनिर्णित राखला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. यासह मुंबईने तब्बल 15वेळा इराणी चषक उंचावण्याची किमया साधली.
मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार रहाणेची कामगिरी…
भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचे जुने दिवस परतताना दिसत आहेत. या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने रणजी करंडक जिंकला. त्यानंतर त्याच्याच नेतृत्वात इराणी चषक जिंकण्यातही मुंबई संघाला यश आले. इतकेच नव्हे तर, ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. इंडियाने चार सामन्याच्या कसोटी मालिकेवर 2-1 ने कब्जा केला होता. त्यामुळे मुंबई संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रहाणेकडे पाहिले जाते.





