पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी पदवी प्रमाणपत्राची छपाई आता “आऊटसोर्स’ न करता विद्यापीठात केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाची जवळपास वार्षिक 50 लाखांची आर्थिक बचत होणार आहे. विद्यापीठाने स्वत:च छपाई करीत आत्मनिर्भरकडे पाऊल उचलले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये परीक्षा मुद्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातर्फे पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रके, ट्रान्सक्रिप्ट आणि लेजर्स यांची छपाई केली जाणार आहे. या परीक्षा मुद्रण कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर, उपकुलसचिव डॉ. अनिल लोखंडे, विशेष कार्याधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मुद्रण कक्षामार्फत यंदाच्या 117व्या पदवीप्रदान समारंभापासून पदवी प्रमाणपत्रांची छपाई केली जात आहे. विद्यापीठामार्फतच पदवी प्रमाणपत्रांची छपाई केल्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे सुरक्षित राहणार आहे. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परीक्षा प्रमाणपत्र व परीक्षा मुद्रण कक्ष यांच्या समन्वयातून पदवी प्रमाणपत्रांच्या डेटा प्रक्रिया व छपाई करिता “एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून वेबबेस्ड अत्यंत सुरक्षित संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.